Sppu Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (sppu) भरमसाठ वाढलेल्या शुल्कासह इतर मागण्यांसंदर्भात दि. ११ ते १३ जुलै दरम्यान भर पावसात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. विद्यापीठ प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत १० दिवसांत सर्व मागण्या पूर्ण करू, असे लेखी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितले होते.(sppu pune university) 

परंतु विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर दुर्लक्ष करून प्रशासनाने ऐनवेळेस जबाबदारी झटकली आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांना १० दिवसात पूर्ण करू, असे SPPU विद्यापीठ प्रशासन म्हणाले होते. त्यानुसार चर्चेसाठी विद्यार्थ्यांनी प्र-कुलगुरू संजीव सोनवणे यांची सोमवारी (दि. २५) वेळ घेतली होती. 

मात्र ते या बैठकीला अनुपस्थित राहून त्यांच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी पाठविले होते. यात कोणत्याही प्रकारचा निष्कर्ष निघाला नाही. म्हणून विद्यार्थी पुन्हा काल (दि. २६) प्रत्यक्ष प्र-कुलगुरूंना भेटले असता १४ दिवस उलटूनही प्रत्यक्षात कोणत्याही मागणीवर काम झालेले नाही, असे आढळून आले. यावरून विद्यापीठ (sppu university) प्रशासनाची विश्वसनीयता धोक्यात आली आहे, असे दिसून येत आहे.

मी कायमचा कुलगुरू असतो तर केलं असतं, असे प्र-कुलगुरू संजीव सोनवणे यांनी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीसमोर म्हणत आपली जबाबदारी झटकली. मात्र प्र-कुलगुरू यांनी स्वतः संवेदनशीलता दाखवत १० दिवसात मागण्या पूर्ण करू असं सांगत विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घ्यायला सांगितले होते.

१० दिवसात आश्वासन पूर्ण करेल असे आम्हाला वाटले होते. मात्र विद्यापीठाने आमची घोर निराशा केली. यामुळे विद्यापीठातील कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव यांच्यावरील विश्वासच उडाला आहे. याविरोधात आमचा लढा कायम सुरूच असणार.

- तुषार पाटील निंभोरेकर सदस्य, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती